Mumbai Boat Capsized : नीलकमल बोट अपघातात आठ जण बेपत्ता, ७७ जणांना वाचवण्यात यश

#image_title

मुंबई ।  मुंबईतील एलिफंटा परिसरात सायंकाळी घडलेल्या बोट दुर्घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ८० प्रवाशांपैकी ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप ८ प्रवासी बेपत्ता असल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेतली आहे. रायगड आणि मुंबई जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत बचावकार्य गतीने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नौदल, तटरक्षक दल, जेएनपीटी आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोध व बचाव कार्य सुरू आहे.

जखमी प्रवाशांची स्थिती

रेस्क्यू ऑपरेशननंतर : 56 प्रवाशांना जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर एका जणाचा रुग्णालयात मृत्यू झाला असून,  9 जणांना नौदलाच्या डॉकयार्डमध्ये भर्ती करण्यात आले आहे. त्यापैकी आठ जणांची प्रकृती स्थिर असून, एक जण चिंताजनक स्थितीत आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल 9 जणांची प्रकृती स्थिर आहे. बोटीत असलेले पाच क्रू मेंबर सुरक्षित आहेत.

राजकीय प्रतिक्रिया
शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला असून, शेकापचे नेते जयंत पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून मदतीचे आवाहन केले. बोटीला नौदलाच्या बोटीची धडक बसल्याचा आरोप पाटील यांनी केला, मात्र नौदलाने याला स्पष्ट नकार दिला आहे.

अपघाताचे कारण अजून अस्पष्ट
अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी तपास सुरू आहे. सध्या प्राथमिकतेने बचावकार्य आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाकडून बचावकार्य जोमाने सुरू आहे.