‘जळगाव तरुण भारत’ परिवारातर्फे पांझरापोळ संस्थानमध्ये ‘गौ सेवा’

जळगाव : राष्ट्रीय विचारांच्या ‘जळगाव तरुण भारत’ परिवारातर्फे येथील पांझरापोळ संस्थानमध्ये शनिवार, २८ रोजी  सकाळी ‘गौ सेवा’ करण्यात आली. ‘सामूहिक गौ सेवा एक अनुष्ठान’ या अभियानांतर्गत सव्वा मणी लापसी गोमातांना खाऊ घालण्यात आली. सर्वांनी लापसीचे लाडू बनवून गोमातांना खाऊ घातले. सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

गौसेवाव्रती अॅड. विजय काबरा यांच्या आवाहनानुसार कार्यक्रम घेण्यात आला. गौसेवेचे सामाजिक, शास्त्रीय, धार्मिक महत्त्व यावर अॅड. काबरा यांनी प्रकाश टाकला. जीवनात पंचगौव्याचे महत्त्व उदा. गाईचे तूप, दूध. शेण, गोमुत्र यांचे महत्त्व सांगून मानवी जीवनात ते कसे उपयोगी आहे, हे स्पष्ट केले. सर्वांनी गौसेवा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. जळगाव शहर, जिल्हा व राज्यात २००९ पासून ‘सामूहिक गौसेवा एक अनुष्ठान’ला सुरुवात झाली आहे.

पांझरापोळ संस्थानमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती गौसेवाव्रती अॅड. विजय काबरा यांनी उपस्थितांना दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य घटकदेखील येथे वर्षभर गोसेवा करतात, यातून गोमातेची सेवा केल्याचे समाधान चेहन्यावर झळकते, हा आयुष्यातील आनंदाचा क्षण असत्याची भावना जनसामान्य व्यक्त करतात, असेही अॅड. काबरा यांनी सांगितले.

सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त ‘तरुण भारत’चे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांनी लड्डा यांचे प्रतिमा भेट देवून अभीष्टचिंतन केले आणि त्यांना दीर्घायुष्य चिंतिले. यावेळी सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे सहप्रकल्प प्रमुख संजय नारखेडे यांच्यासह ‘तरुण भारत’ परिवारातील सदस्य उपस्थित होते.