गौतम अदाणी आणि शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’वर बंद दाराआड दोन तास चर्चा

मुंबई : अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक बंगल्यावर भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. या दीर्घ भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप बाहेर आला नसला तरी या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे.

अदानी समुहावर हिंडेनबर्गचा बॉम्बगोळा आदळल्यानंतर देशात मोठा गदारोळ झाला. काँग्रेसने विशेषत: राहुल गांधी यांनी या मुद्दयावरुन रानं उठवलं. या प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी संसदेचं कामकाज देखील होवू दिला नाही. मात्र या प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. हिंडेनबर्ग हे नावही मी कधीच ऐकलेलं नाही. त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या.

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता आज गौतम अदाणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदाणी हे आपल्या काळ्या रंगाच्या कारमधून सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीत या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते समजू शकलेलं नाही. मात्र या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं असून आता या भेटीवरून विविध चर्चांना सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, शरद पवार आणि गौतम अदाणी हे एकमेकांना भेटले तेव्हा त्या ठिकाणी कुणीही इतर उपस्थित नव्हते.