Gautam Gambhir Team India vs Australia । ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची दुसरी तुकडी आज सोमवारी रवाना होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येतोय का ? तो पहिली कसोटी खेळणार का ? तो नसेल तर कॅप्टन कोण, ओपनिंगला कोण येईल ? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार गंभीरवर करण्यात आला आणि त्यानेही तितक्याच सफाईने सर्व उत्तरं दिली.
भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची एक तुकडी कालच ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली. टीम इंडियाची दुसरी तुकडी आज सोमवारी रवाना होणार आहे.
रोहित खेळणार की नाही ?
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी खेळणार की नाही याचं स्पष्ट उत्तर गौतम गंभीर यालाही देता आलं नाही. त्यामुळे रोहित खेळणार की नाही ? हे सामन्याआधी टॉसवेळेसच स्पष्ट होईल. तसेच रोहित जर खेळणार नसेल तर त्याच्या जागी कॅप्टन कोण असणार ? तसेच रोहितच्या जागी कुणाला संधी मिळणार ? हे गंभीरने सांगितलं.
रोहितलाच प्रश्न विचारण्यात आला, पण…
ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी सामना खेळणार की नाही याबाबत अधिक स्पष्टतेसाठी न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर थेट रोहितलाच प्रश्न विचारण्यात आला होता. पण, तेव्हा रोहितकडून मिळालेल्या उत्तरानुसार, जर-तर अशी परिस्थिती होती. रोहित पर्थमध्ये होणारी पहिली कसोटी खेळणार की नाही याचा निर्णय मालिका सुरू होण्यापूर्वी घेतला जाईल, असे गंभीरने सांगितले.
रोहित खेळला नाही तर बुमराह कर्णधार असेल. रोहितच्या बाजूने अद्याप काहीही स्पष्ट झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि हेच कारण आहे की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरलाही याचे उत्तर सापडले नाही. गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत सांगितले की, जर रोहित खेळला नाही तर त्याच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल. रोहित शर्माचा अलीकडचा फॉर्मही डळमळीत झाला आहे. पण, ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीरने सांगितले की, मला रोहित आणि विराटच्या फॉर्मची चिंता नाही.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.