सांगली : विविध मागण्यांसाठी अनेकांनी आंदोलन केल्याचं आपण वाचलं असलेच, परंतु सांगलीच्या आटपाडी येथील एका एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्याने अनोखं आंदोलन सुरु केले असून अखेर त्यांना न्याय मिळाला आहे. एस टीच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेत पतीला एक दिवसाची रजा दिली आहे.
काय आहे नेमकी बातमी?
अधिक माहिती अशी की, विलास कदम हे 33 वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवेत आहेत. 70 दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची 270 दिवस रजा शिल्लक आहे. त्यांनी आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसांच्या रजेसाठी आगारप्रमुखांकडे 6 मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र, सुटी नाकारल्याने पत्नी नलिनी यांनी आगारप्रमुखांच्या केबिनबाहेर अंथरुण टाकून आंदोलन सुरू केले होते. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली होती.
दरम्यान, त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला अखेर यश आले असून एस टीच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेतली. तसेच आज त्याच्या पतीला उपचारासाठी एक दिवसाची रजाही दिली आहे.