घरकुल घोटाळा : माजी नगरसेवक बालाणी, ढेकळे, भोईटेसह सोनवणे सहावर्षांसाठी अपात्र

जळगाव :  तत्कालीन जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळ्यातील माजी नगरसेवक भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे व स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांना 31 ऑगस्ट 2019 पासून सहा वर्षांसाठी अपात्र करण्यात आल्याचे आदेश महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी 29 नोव्हेंबर रोजी काढलेत.

तत्कालीन नगरपालिका असताना शहरात विविध ठिकाणी घरकुले उभारण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी याबाबत शहर पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तत्कालीन पोलीस तपासाधीकारी इशू सिंधू यांनी तपास करून 2012 मध्ये घरकुल घोटाळ्यातील आजी माजी 48 नगरसेवक, दोन मुख्याधिकारी, दोन माजी मंत्री, माजी महापौरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. याबाबत धुळे येथील विशेष न्यायालयाने अंतिम निकाल देत या सर्वाना घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवून त्यांना 31 ऑगस्ट 2019 रोजी कारावासाची शिक्ष्ाा सुनावली होती.

यासोबतच जळगाव न्यायालयाने याबाबत 13 एप्रिल 2023 च्या दिलेले निकालपत्र, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव यांचे 21 सप्टेंबर 23 च्या पत्रानुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 10 (अ-एक) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, 1970 याच्या कलम 5 प्रारंभानंतर भारतीय दंडसंहितेचे कलम 153-अ किंवा कलम 505 पोट-कलम (2) किंवा (3) अन्वये, शिक्षापात्र अपराधाबद्दल सिध्दापराध ठरविण्यात आले आहे. त्यानुसार निवडून आलेले तत्कालीन नगरसेवक भगतराम रावलमल बालाणी, सदाशिव गणपत ढेकळे, लताबाई रणजित भोईटे व स्विकृत नगरसेवक कैलास नारायण सोनवणे यांना 31 ऑगस्ट 2019 पासून सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

जळगांव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 01 ऑगस्ट 2018 रोजी झाली होती. 03 ऑगस्ट 2018 रोजी सार्वत्रिक निवडणूकीचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे. जळगांव शहर महानगरपालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये  वरील सदस्यांना सिध्द अपराध ठरविणेत आलेले आहे.  त्यानुसार आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी 29 नोव्हेंबर रोजी आदेश काढून सहा 31 ऑगस्ट 2019 पासून पुढील सहा वर्षासाठी अपात्र ठरविले आहे.