आज पृथ्वीजवळून जाणार महाकाय उल्का; १६ किलोमीटर प्रतिसेकंद असणार वेग

तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। वीस दिवसांपूर्वी शोध लागलेल्या ‘२०२३ एफएम’ नावाच्या २०० मीटर व्यासाची उल्का (अश्नी ) आज, गुरुवारी पृथ्वीजवळून जाणार आहे. ही उल्का कक्षेबाहेरून जाणार असली तरी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिची दिशा भरकटल्यास पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. मात्र ती पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता तशी कमीच असल्याचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

सूत्रानुसार, गेल्या काही वर्षांत पृथ्वीजवळून जाणाऱ्या उल्कांपैकी ही सर्वांत मोठी आहे. २०० मीटर व्यासाची ही उल्का १६ किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने जात आहे. नासा यावर लक्ष ठेवून आहे. या उल्काचा मार्ग न भरकटल्यास ती सरळ जावून पुढे पृथ्वी प्रदक्षिणा करणार किंवा पुन्हा सौरमालेला वेढा देऊन निघून जाईल. अशा शेकडो उल्का पृथ्वीला प्रदक्षिणा करीत असतात, तर हजारो दरवर्षी पृथ्वीच्या जवळून निघून जातात.

दोनशे मीटर व्यासाची उल्का पृथ्वीवर धडकल्यास एखादे शहर उदध्वस्त होऊ शकते. यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये ५० हजार वर्षांपूर्वी अशीच एक उल्का कोसळली होती. यानंतर मोठी हानी झाली होती.