जळगाव : इर्शाळवाडी दरड दु्र्घटनेत आतापर्यंत 22 ते 24 जणांचे मृतदेह सापडले आहेत, मात्र एक ते दोन दिवसांत मृतांचा नेमका आकडा समोर येईल, सलग तिसऱ्या दिवशी इर्शाळवाडीत बचावकार्य सुरू असून अजून बरेच जण ढिगाऱ्याखाली असल्याचा अंदाज वर्तवला जातोय, यातच मंत्री गिरीश महाजन यांनीही तशीच काहीशी भीती व्यक्त केली आहे. या घटनेवरुन कोणी राजकारण करु नये, असं उत्तर महाजनांनी टीका करणाऱ्यांना दिलं.
जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमात गिरीश महाजन उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेवर भाष्य केलं. धोक्याच्या यादीत इर्शाळवाडी गाव नव्हतं, अचानक हे संकट कोसळलं असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
एवढं मोठं संकट येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं त्या ठिकाणच्या रहिवाशांनी सुद्धा म्हटल्याचं महाजन म्हणाले. अतिवृष्टी, पाऊस आणि वादळामुळे हा डोंगर कोसळल्याचं ते म्हणाले. धोकादायक डोंगर आणि त्याखाली वस्ती अशा धोक्यांच्या यादीमध्ये ही वाडी नव्हती, मात्र दुर्दैवाने या ठिकाणी ही मोठी घटना घडल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
इर्शाळवाडीत दरड दुर्घटना घडल्याच्या काही तासांतच मंत्री गिरीश महाजन मध्यरात्री अडीचला सर्वप्रथम इर्शाळवाडीत पोहोचले होते आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलं होतं. ज्या ठिकाणी सायकलही पोहोचू शकत नाही, अशी चिखलाची पायवाट सर करत गिरीश महाजन इर्शाळगड डोंगरावर असलेल्या इर्शाळवाडीत पोहोचले होते.
दरड कोसळून इर्शाळवाडीतील घरंच्या घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तर दुसरीकडे याठिकाणी सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कुठलीच मशिनरी याठिकाणी पोहोचू शकत नसल्याचंही महाजन म्हणाले. हाताने दुर्घटनास्थळावरील माती बाजूला करावी लागत आहे आणि त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
इर्शाळगड परिसरात अजूनही पाऊस सुरू असल्याने मदत कार्यात अडचणी येत असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. हाताने माती काढण्यात वेळ जात आहे, त्यानंतर काम थांबवावं लागतं. ढिगाऱ्याखालील मृतदेह बाहेर काढता न आल्याने ते कुजतील आणि त्याला दुर्गंधी सुटेल, अशी भीती देखील गिरीश महाजनांनी व्यक्त केली.
माळीण येथील घटनेप्रमाणे रायगडमधील मागच्या घटनेतही मृतदेह बाहेर काढता न आल्याने ते तिथेच कुजले होते आणि त्याच ठिकाणी त्यांचे पंचनामे करावे लागले होते, इर्शाळवाडीत देखील आता त्याचप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केली. त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढू शकतो, असंही ते म्हणाले.