निवासी डॉक्टरांना गिरीश महाजनांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : राज्यभरातले निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे रूग्णांचे हाल होतं आहेत. अशात गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत संप मागे घेण्याचं आवाहन निवासी डॉक्टरांना केलं आहे. आम्हाला निवासी डॉक्टरांना भेडसावणार्‍या समस्या माहित आहेत. निवासी डॉक्टरांनी आम्हाला १५ दिवसांचा अवधी द्यावा. उगाच संप करायचा म्हणून संप करू नका असं आवाहनही गिरीश महाजन यांनी केलं आहे.

राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यासाठी आजपासून संप पुकारला आहे. अतिदक्षता विभाग वगळता सर्व विभागांच्या सेवा बंद ठेवण्याचा इशारा मार्डने दिला. त्याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न आपण मार्ग लावली आहे. तसंच त्यांची जी एरिअर्सची मागणी आहे ती देखील आम्ही वित्तविभागाकडे दिली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आम्ही निवासी डॉक्टरांना हेदेखील सांगितलं की १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल. आम्ही सकारात्मक आहोत. सरकार सकारात्मक आहे अशात निवासी डॉक्टरांनी अशा प्रकारे संप पुकारणं योग्य नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

आम्ही सगळेच निवासी डॉक्टरांच्या अडचणी जाणून आहोत. मी या प्रयत्नात असतो की संपाची वेळ येऊ नये. सरकार तुमच्याशी चर्चाच करत नसतं तर संपाची भूमिका योग्य आहे. मात्र तसं काहीही घडलेलं नाही असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. आम्ही १४३२ लोकांच्या जागा भरण्यासाठी १५ दिवसांचा अवधी मागितला आहे. हायपॉवर कमिटीच्या मिटिंगचे निर्णयही आम्ही दाखवले. तरीही निवासी डॉक्टर हे ताणत असतील तर ते योग्य नाही असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. माझ्याकडे त्यांनी मागण्या मांडल्या असत्या, चर्चा केली असती तर संपाची गरजच पडली नसती असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

मार्डच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
रिक्त पदं भरण्याची मागणी प्रामुख्याने मार्डकडून करण्यात आली आहे
२०१८ पासूनचे थकीत रक्कम देण्याची मागणी केली गेली आहे
मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट आणि असिस्टंट प्रोफेसर या जागाही भरल्या गेलेल्या नाहीत त्या भरल्या जाव्यात अशीही मागणी केली गेली आहे