पुणे : धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी समाजाच्या ज्या योजना आहेत त्या लागू करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र तरी देखील धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे. आता धनगर आरक्षणाबाबत सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, चौंडीमध्ये गेल्या १८ दिवसांपासून धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत धनगर शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. जवळपास मार्ग निघालेला आहे. उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढणार आहोत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणावर बोलतांना महाजन म्हणाले की, मराठा आरक्षणाची मुदत संपलेली नाही. मराठा आरक्षणासाठी एक समिती नेमली आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा तपास सुरू आहे आणि यातून निश्चित मार्ग निघेल. ठरवलेल्या कालावधीतून निश्चितपणे चौकशी करून यातून योग्य तो मार्ग काढू, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांबाबबत महाजन म्हणाले की, विरोधकांना दुसरं काम नाही, त्यामुळे त्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही तुमचे लोक सांभाळा, तुम्ही व्यवस्थित रहा. स्वतःचं सोडायचं आणि दुसऱ्याच्या पाठीमागे पळायचं हा उद्योग का करायचा ? पंकजा मुंडे आमच्या सोबत आहेत, असही महाजन यांनी स्पष्ट केलं.