गिरीश महाजनांनी घेतली उदयनराजेंची बंद दाराआड भेट; बाहेर येवून म्हणाले…

सातारा : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली. दोन्ही भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत. उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, उदयनराजेंचं नाव दोन्ही यादीत जाहीर झालं नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच आता भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन उदयनराजेंच्या भेटीसाठी आले होते.

उदयनराजेंसोबतच्या भेटीनंतर गिरीश महाजन म्हणाले की, महाराजांचा नावलौकिक आहे. त्यांच्या नावाचा एक वलय आहे आणि म्हणूनच त्यांचा जास्तीत जास्त मतदानासाठी, प्रचारासाठी कसं उपयोग करता येईल यावर चर्चा केली. येणाऱ्या काळामध्ये फार वेळ राहिला नाही. त्या काळामध्ये महाराज कुठे-कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्त फायदा कसा होईल हे पाहणार आहे.

महाराजांनी तिकीट मागायची गरज नाही. तिथे आमची गरज आहे. त्यामुळे राज्यात तीन पक्ष असल्यामुळे वाटाघाटी सुरू आहेत. महाराजांचे तिकीट निश्चित आहे, त्याबद्दल मला सांगायची गरज नाही. तीन मित्रांची सोबत असल्यामुळे त्याची चर्चा करावी लागते, तशा वाटाघाटी चालल्या आहेत. सातारा लोकसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असेही ते म्हणाले.