---Advertisement---
Girish Mahajan on Uddhav Thackeray : हिंदी सक्तीचे जीआर राज्य सरकारने रद्द केल्यानंतर उद्धवसेना आणि मनसे यांच्यातर्फे काल शनिवारी ‘आनंद’ मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी ”आम्ही मराठीसाठी एकत्र आलो आहोत”, असे म्हटले असले, तरी आगामी निवडणुकीत ते एकत्र येतील, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला असून, या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गेल्या अनेक महिन्यांपासून उद्धवसेनेला मोठी गळती सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. अर्थात पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता अशातच पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?
उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नसल्याने, पक्षात उरलेले आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तुम्हाला हे थोड्याच कालावधीत दिसून येईल,” असे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे. आता मंत्री महाजन यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात हिंदी सक्ती लागू करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला होता. हा निर्णय मंत्रिमंडळात मान्य करण्यात आला होता, त्यावर त्यांच्या सह्याही आहेत. मात्र आता, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तेच या निर्णयाला विरोध करत असून, या बाबतीत त्यांनी पलटी घेतली आहे. उद्धव ठाकरे हे “पलटीबहाद्दर” आहेत, अशी टीका मंत्री महाजन यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केली.