Girish Mahajan on Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेले ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे शनिवारी (१७ मे) रोजी प्रकाशन होणार आहे. मात्र, या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. आता आरोपवर जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री महाजन ?
मंत्री महाजन म्हणाले, संजय राऊत काय बोलतात, आता ते कोणी ऐकतही नाही. नुकते ते बडबड करत असतात. नुकतेच पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत करत होते. युद्ध सुरु असताना सैनिकांबद्दल काहीही बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहजी यांना मदतीचा हात दिला असेल तर चांगलंच आहे. आम्ही आधी पण शिवसेनेसोबत होतो आणि आताही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत.
राऊत यांना किती महत्त्व द्यायचे आणि त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व द्यायचे हे पाहावे लागेल. आता त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यांचे कोणी ऐकत नाही. सकाळपासून त्यांचा भोंगा सुरू होतो. संपूर्ण देश हा पंतप्रधान मोदींच्या, सैन्याच्या पाठीशी उभा असताना त्यावेळी ते म्हणत होते मोदींनी राजीनामा द्यावा. आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावे की देशांतर्गत असलेल्या या अतिरेक्यांशी लढावे? असा सवाल उपस्थित करत मंत्री महाजन यांनी राऊत यांना अतिरेकी म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.