प्रवाशांनीच रोखली गीतांजलि एक्सप्रेस ; जाणून घ्या सविस्तर

भुसावळ : मुंबईहून हावडाकडे निघालेल्या डाऊन गीतांजली एक्स्प्रेसच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर भुसावळात संतप्त रेल्वे प्रवाशांनी दिड तास रेल्वे रेल्वेस्थानकावर रोखून धरली. या प्रकारानंतर यंत्रणेने धाव घेत बिघाड दुरूस्त केल्यानंतर बुधवारी दुपारी पावणेतीन वाजता गाडी पुढील प्रवासासाठी निघाली.

 

जनरेटर व्हॅनमध्ये तांत्रिक अडचण

झाले असे की, मुंबईहून हावडाकडे निघालेल्या 12859 या गाडीतील जनरेटर व्हॅनमध्ये टेक्नीकल अडचण निर्माण झाल्यानंतर आठही बोग्यांमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. बुधवारी दुपारी 1.15 वाजता प्लॅटफार्म क्रमांक सातवर गाडी आल्यानंतर रेल्वे प्रवाशांनी या प्रकारानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली व गाडीची मार्गस्थ होवू लागताच चैन पुलिंग करून गाडी रोखण्यात आली. यावेळी रेल्वे अधिकार्‍यांसह संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेतली. एसी बोगींना (कोच) जनरेटर व्हॅनमधून पुरवठा होत नसल्याने व सप्लाय ट्रीप होत असल्याची समस्या समोर आल्यानंतर तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्यानंतर सर्व बोगींना विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर वातानुकूलित यंत्रणा कार्यरत झाल्यानंतर 2.44 वाजेच्या सुमारास गाडी पुढील प्रवासाला रवाना झाली. यावेळी स्टेशन मॅनेजर मनोज श्रीवास्तव यांच्यासह रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलीस उपस्थित होते.