जागतिक स्तरावर भारताची संगणकीय भरारी

इतस्तत:

– दत्तात्रेय आंबुलकर

गेल्या दशकांत भारताने तंत्रज्ञानावर आधारित उद्योग-व्यवसाय क्षेत्रात जोरदार आघाडी घेतलेली दिसते. त्यातही विशेषत: संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित अशा आधार व युनायटेड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय या आणि यांसारख्या प्रगत पद्धतीमुळे तर भारतीय तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ यांच्या कल्पक कामगिरीचा यशस्वी डंका उभ्या जगात आता गाजतो आहे. याच दरम्यान घडून आलेली महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, अद्ययावत व प्रगतिशील अशा Computer-Technology संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांच्या यशस्वी कार्यकर्तृत्वाचाच परिणाम म्हणजे भारताला आता जागतिक स्तरावर संगणक-तंत्रज्ञानाचा पथदर्शी वा मार्गदर्शक देश म्हणून मान्यता मिळाली आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. आज जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व भारतीय तज्ज्ञ मंडळी करीत असून या महत्त्वपूर्ण बदलांची नोंद उभ्या जगाने घेतली आहे. एवढेच नव्हे, तर संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय क्षेत्रात व्यवस्थापक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्चपदांवर नेमणूक करण्यासाठी सध्या भारतीयांना प्राधान्याने समाविष्ट करून घेतलेले आपण पाहतो. काही देशांनी तर यासाठी काही धोरणात्मक निर्णयसुद्धा घेतले आहेत. परिणामी, ही मंडळी आज विविध देशांच्या सफल व यशस्वी आर्थिक-व्यावसायिक प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत.

भारत आणि भारतीयांना प्रतिष्ठेच्या व उच्चस्तरीय संधी जागतिक स्तरावर व लक्षणीय स्वरूपात मिळविण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, गेल्या पिढीपासून भारतीय संगणक तंत्रज्ञांना मिळालेले प्रगत उच्च शिक्षण व प्रशिक्षण. पुढे त्यालाच जोड मिळाली ती आपल्या तंत्रज्ञांच्या कल्पक आणि उद्यमशीलतेची. धाडसी, महत्त्वाकांक्षी व निर्णयक्षम व्यवस्थापन शैलीमुळे आपल्या तंत्रज्ञांच्या प्रतिभेची प्रगतिशील साक्ष देश-विदेशातील प्रमुख कंपन्यांना मिळाली. यातूनच प्रगतीची नवी दिशा आणि नव्या संधी भारतीयांना कशा लाभत गेल्या, हा ताजा इतिहास म्हणूनच पडताळण्यासारखा आहे. Computer-Technology संगणक-तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि भारतीयांनी मिळविलेल्या या जागतिक यशाला विशेष गती मिळाली, ती कोरोना आणि त्यानंतरच्या 2019-20 याच कालखंडात. संगणकीय व्यवहार आणि त्याद्वारे होणारी उलाढाल यात लक्षणीय वाढ झाली. अचानक झालेल्या या व्यावसायिक वाढीच्या कालावधीत एकीकडे अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये निर्माण झालेल्या आव्हानांचा प्रभावी सामना हे देश आणि तेथील व्यावसायिक व्यवस्थापन क्षेत्र करू शकले नाही. याउलट भारतात उपलब्ध असणारे संगणकीय क्षेत्र आणि क्षमता यामध्ये युद्धस्तरावर काम करण्यात आले. देशांतर्गत व्यावसायिक व व्यवस्थापन क्षेत्रात लवचिकता, जिद्द व कार्यक्षमतेला विशेष गतिमान करण्यात आले. परिणामी, विविध देशांमधून भारतीय संगणक तंत्रज्ञानाचा वाढता वापर करण्यावर भर दिला गेला. जागतिक स्तरावर व्यवसाय चक्र गतिमान करण्यासाठी एक सशक्त पर्याय यानिमित्ताने उभा ठाकला.

कोरोना काळातील आरोग्यविषयक निर्माण झालेली आव्हाने, व्यावसायिक अस्थिरता, सार्वत्रिक अस्थिरता, कर्मचार्‍यांची तत्कालीन मानसिकता ही आव्हाने भारतातील औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच संगणक क्षेत्रापुढे होतीच. राष्ट्रीय स्तरावरील बंदी व विविध निर्बंध यामुळे परिस्थितीचे गांभीर्य आणखीनच वाढले. व्यावसायिक कामातील चढ-उतार, अचानक झालेले वा होऊ शकणारे बदल यामुळे कर्मचार्‍यांचे प्रसंगी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाणही वाढले. यावर भारतीय कंपन्यांनी तातडीच्या ज्या परिणामकारक उपाययोजना, ज्या पद्धतीने केल्या, त्या दखलपात्र ठराव्या. भारतीय संगणक कंपन्यांनी केलेल्या तत्कालीन मुख्य उपाययोजनांमध्ये वाढत्या जागतिक व्यवसायाची पूर्तता करण्यासाठी कर्मचार्‍यांची निवड, नियोजन करणे, कर्मचार्‍यांना आवश्यक व मूलभूत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांची विविध स्तरांवर नेमणूक करणे, व्यावसायिक गरजांनुरूप तंत्रज्ञान व कामकाज विकसित करणे व या सर्वाला अल्पावधीत आवश्यक तंत्रज्ञानाची साथ देणे यांचा प्रामुख्याने समावेश होता. या प्रयत्नांना संबंधित कर्मचार्‍यांची साथ लाभली, हे महत्त्वाचे. बदलत्या व्यावसायिक गरजांनुरूप काम करण्याच्या दृष्टीने कर्मचार्‍यांमध्ये प्रशिक्षणावर आधारित क्षमतावाढ होणे महत्त्वाचे होते. चाकोरीबद्ध कामाव्यतिरिक्त वेगळे व वाढत्या कौशल्यांसह काम करणे, हे मोठे आव्हानपर काम होते. भारतीय कर्मचारी या कौशल्य कसोटीवर खर्‍या अर्थाने खरे उतरले. याद्वारे विविध कंपन्यांमधील कर्मचार्‍यांनी Computer-Technology संगणक तंत्रज्ञान प्रगत स्वरूपात शिकून त्याची व्यावसायिक गरजांनुरूप अंमलबजावणी केली.

यासंदर्भात भारतातील युवा वयोगटातील व प्रशिक्षित आणि रोजगारक्षम संख्येतील उपलब्ध मानव संसाधनांची नोंद जागतिक स्तरावर आवर्जून घेण्यात आली. बदलत्या शैक्षणिक व व्यावसायिक संदर्भात विद्यार्थी-उमेदवारांची त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार म्हणजेच सायन्स, टेक्नोलॉजी, इंजिनीअरिंग व मॅथेमॅटिक्स या पारंपरिक पात्रता परंपरेला आता संगणक तंत्रज्ञानाची सार्वत्रिक जोड देण्यात आली. याचा फायदा लक्षणीय स्वरूपात दिसून आला. वरील पात्रताधारक उमेदवारांबद्दल संख्यात्मक स्वरूपात नमूद करायचे म्हणजे, जागतिक संख्या व टक्केवारीच्या संदर्भात भारतातील पात्रताधारक उमेदवारांची संख्या दुसर्‍या स्थानावर आहे. या संदर्भात नॅसकॉमतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार भारतात Computer-Technology तंत्रज्ञान प्रशिक्षित उमेदवारांची व्यावसायिक उपलब्धता आणि आवश्यकता यातील तफावत सुमारे 21 टक्के आहे. असे असले तरी इतर जागतिक स्तरावरील अमेरिका, चीन, इंग्लंड, जपान, कॅनडा व ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रगत देशांमध्ये असणार्‍या उमेदवारांच्या पात्रतेची उपलब्धता व योग्यता याच्याशी तुलना करता, भारतातील ही टक्केवारी तुलनेने सर्वात कमी आहे.

अर्थात, जागतिक स्तरावर Computer-Technology संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि भारतीयांना आज वाढती मागणी असताना अशा प्रकारे भारतीय तज्ज्ञ आणि संगणक तंत्रज्ञ विदेशात जात असताना अथवा अशा कंपन्यांसाठी विशेष कामगिरी करीत असताना, भारतातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रात संगणक क्षेत्रात अद्ययावतदृष्ट्या तज्ज्ञ उमेदवारांची चणचण निर्माण होऊ शकते. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी विशेष प्रयत्न शासन-प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने पुढील उपायांचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील प्रचलित व प्रस्तावित व्यावसायिक गरजांची भारतातून व भारतीय तंत्रज्ञांद्वारे पूर्तता करण्यासाठी देशांतर्गत तज्ज्ञ व अनुभवी मंडळींना प्रेरित, प्रोत्साहित करणे, तातडीने प्रगत तंत्रज्ञान विकसित करून आत्मसात करण्यासाठी उद्योग-व्यवसाय व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रभावी समन्वय साधणे, संशोधनाला पुरेसे पाठबळ देणे, जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानावर आधारित वाढत्या स्पर्धेला तोंड देणे व हे सारे घडवून आणण्यासाठी आवश्यक व्यावसायिक व्यवस्थेची निर्मिती करणे. हे उपाय भारताला निश्चितपणे पूरक ठरणार असून त्यामुळे नजीकच्या भविष्यात संगणक-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचा प्रभाव जागतिक स्तरावर अधिक प्रभावी राहील, यात शंका नाही.

(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
– 9822847886