‘गोध्रा: अपघात की षड्यंत्र’, चित्रपटाचा टीझर रिलीज

नवी दिल्ली : गुजरातमध्ये २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्राहून अहमदाबादला जाणार्‍या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनला आग लागली होती, ज्यात ५९ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेवर आता चित्रपट बनवला जात आहे. या चित्रपटाचे नाव ‘गोध्रा: अपघात की षड्यंत्र’ असे असून त्याचा टीझरही रिलीज झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा टीझरमध्ये करण्यात आला आहे.

टीझरची सुरुवात ट्रेनच्या व्हिज्युअलने होते आणि त्यानंतर ट्रेनला आग लागल्याचे दाखवण्यात आले आहे. टीझरमध्ये एक फाईलही दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये नानावटी मेगाटा कमिशन लिहिले आहे. एम के शिवाक्ष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर बीजे पुरोहित आणि राम कुमार पाल निर्मिती करणार आहेत. चित्रपटाच्या कलाकारांशी संबंधित माहिती अद्याप निर्मात्यांनी दिलेली नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही.

यूट्यूबवर टीझर शेअर करताना दावा करण्यात आला आहे की, निर्मात्यांनी दावा केलाय की, त्यांनी चित्रपटासाठी कठोर परिश्रम केले आणि हा चित्रपट बनवण्यापूर्वी पाच वर्षे संशोधन केले आहे. संशोधनादरम्यान अनेक आश्चर्यकारक तथ्ये समोर आली आहेत, ज्यांचा चित्रपटात समावेश करण्यात आला आहे.

काय आहे गोध्रा कांड?
२००२ च्या घटनेत साबरमती ट्रेनच्या एस ६ क्रमांकाच्या बोगीला आग लागली होती. गोध्रा स्टेशनवरुन ट्रेन सुरू होताच ट्रेनची साखळी ओढली गेली आणि ट्रेन थांबली. यानंतर रेल्वेवर दगडफेक करण्यात आली आणि एका डब्याला आग लावण्यात आली. या घटनेनंतर दंगली सुरू झाल्या आणि शेकडो लोक मरण पावले.