गोध्रा कांड दुर्घटना नव्हती… ‘द साबरमती रिपोर्ट’च्या टीझरचा धुमाकूळ

नवी दिल्ली : अभिनेता विक्रांत मेस्सी आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाची झलक दाखवणारा एक छोटासा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. २७ फेब्रुवारीला विक्रांतने याचा टीझर शेअर केला आहे. २२ वर्षांपूर्वी गोध्रा रेल्वेस्थानकात जळणाऱ्या रेल्वेमध्ये ५९ लोकांनी त्यांचे प्राण गमावले होते. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. टीझरमध्ये गोध्रा कांड ही दुर्घटना नव्हती…असे म्हटले असल्याने चित्रपटाविषयी उत्सूकता प्रचंड वाढली आहे. या चित्रपटात विक्रांत एका वृत्तवाहिनीच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

विक्रांत मेस्सीने २७ फेब्रुवारीला टीझर शेअर केला आहे.  ही तारीख निवडण्यामागेही आणखी एक कारण आहे ते म्हणजे ‘गोधरा कांड’ हे २७ फेब्रुवारी २००२ रोजीच घडले होते. हा टीझर शेअर करताना विक्रांतने लिहिलं, “२२ वर्षांपूर्वी गोध्रा रेल्वेस्थानकात जळणाऱ्या रेल्वेमध्ये ५९ लोकांनी त्यांचे प्राण गमावले. त्या सगळ्यांना आज आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. याबरोबरच ‘द साबरमती रिपोर्ट’चा टीझरही शेअर करत आहे जो ३ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.”

या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले असून शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. चित्रपटात विक्रांत मेस्सीसह राशी खन्ना व रिद्धी डोग्रा या अभिनेत्रीही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३ मे २०२४ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. टीझरमध्ये गोध्रा प्रकरणाबद्दल बातमी देताना विक्रांत म्हणतो, गोध्रा कांड दुर्घटना नव्हती…