तरुण भारत लाईव्ह । २५ जानेवारी २०२३। जामनेर तालुक्यातील गोद्री येथे बुधवारपासून 30 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकड़ा समाज कुंभ होत आहे. व्यवस्थेतील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या सहा दिवसीय कुंभात विविध राष्ट्रीय संत, महंत भाविकांना व समाजाला दिशा देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या कुंभ सोहळ्यात सहा दिवसांच्या काळात 10 लाख भाविक हजेरी लावणार आहेत. गोद्रीत 500 एकर क्षेत्रात हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाचा आजपासून शंखनाद होत आहे. गोद्री येथे कुंभाच्या पहिल्या दिवशी 25 रोजी पूज्य धोंडीराम बाबाजी आणि आचार्य चंद्र बाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे
तेलंगाना, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्रासह देशातील 8 राज्यातून कानाकोपर्यातून बंजारा, लबाना व नायकडा समाज उपस्थित राहणार आहे. बंजारा समाज हा हिंदू धर्म जाणणारा व मानणारा समाज आहे. परंतु बंजारा समाजाला धर्मांतरण करण्यासाठी लक्ष्य केले गेले आहे. लातूर येथे बंजारा समाजाने हिंदू संस्कार सोडावे आणि गोर धर्मीय संस्कार अंगीकारावे म्हणून दबाव टाकण्यात आला आहे. बंजारा समाजाचे होणारे ख्रिस्तीकरण रोखण्यासाठी आणि समस्त बंजारा, लबाना व नायकडा समाज एकत्र येण्यासाठी या कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभाचे आयोजन संतांनी आणि बंजारा समाजाने केले आहे. गोद्री कुंभ संचालन समितीचे अध्यक्ष श्यामजी चैतन्य महाराज असून प.पू. बाबूसिंगजी महाराज कुंभाचे अध्यक्ष आहेत.
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरा देवीचे धर्मगुरू प. पू. बाबूसिंगजी महाराज, प.पू. गोपालजी चैतन्य महाराज, प.पू. सुरेशजी महाराज, श्यामजी चैतन्य महाराज, पं.पू. महंत 1008 श्री रामसिंग महाराज, प.पू.1008 श्री श्री चंद्रसिंगजी महाराज कुंभाचे नियोजक व निमंत्रक आहेत. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी केंद्रीय कार्यालय, कुंभस्थळ येथे ध्वजारोहण होणार आहे.
भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी सात नगरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये 50 हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभस्थळी मुख्य सभामंडपाच्या समोरील बाजूस ही भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यात दररोज दीड लाखांपेक्षा अधिक भाविक दिवसभरात भोजन करणार आहेत. साधू, संतासह भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा याठिकाणी पूर्ण झाल्या आहेत.
प्रदर्शनातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचे होणार दर्शन
गोद्री येथील कुंभात हिंदू गोर बंजारा व लबाना नायकड़ा समाजातील भजने, नगारा खेळ पारंपरिक पेहराव पुरुष व महिला, पट खेळणे, साहसी खेळ व तलवार उचलणे. प्रदर्शनी व स्टॉल -इतिहास (महापुरुष, संत व वास्तू), वेशभूषा (पारंपरिक पेहराव), यातून हिंदू गोर बंजारा व लबाना नायकड़ा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन होणार आहे. तसेच भाषेतील पुस्तके, गीत, कथा, धार्मिक स्थळे, संस्कृती दर्शवणारी भव्य प्रदर्शने याठिकाणी लावण्यात येणार आहे.
संत, महंतांचे आगमन
गोद्री कुंभात येथील कुंभात संत, महंताचे आगमन झाले आहे. 30 जानेवारी रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. तसेच संत मोरारजी बापू, श्रीराम जन्मभूमी कोषाध्यक्ष संत गोविंदगिरीजी महाराज, साध्वी ऋतम्भरा देवी, गुरू शरणानंद महाराज, महामंडालेश्वर प्रणवानंदजी महाराज इंदूर, पूज्य अखिलेश्वरजी जबलपूर, श्री महामंडालेश्वर विश्वेश्वरानंदजी, बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमनीजी, बाबा हरनाम सिंगजी पंजाब दमदमी टाकसाल, माता अमृतनन्दमयी कोइंम्बतूर, पूज्य भास्करगिरीजी महाराज देवगड, महामंडालेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर आदी साधू महंत या कुंभाला येणार आहेत.