गोद्री : अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान होत आहे. गोद्री हे जामनेर तालुक्यातील एक छोटंच गाव आहे. या महाकुंभात येण्यासाठी नागरिकांकडून गोद्री गावं युट्युब, गूगलवर मोठया प्रमाणात चर्च केलं जात आहे. विशेष म्हणजे, या कुंभामुळे गोद्री हे गावं जगाचा नकाशावर पोहचलं आहे.
गोद्री महाकुंभात २४ जानेवारी रोजी संत महंतांचे आगमन झाले. यावेळी शोभा यात्रा कुंभस्थळ ते धर्मस्थळा पर्यंत काढण्यात आली. या शोभा यात्रेत ३० हजारांच्या आसपास नागरिक सहभागी झाले होते.
या मिरवणुकीच्या अग्रस्थानी सजवलेल्या वाहनामध्ये मध्ये प.पू.संत श्री धोंडीरामबाबा, प.पू.आचार्य श्री. चंद्रबाबा महाराज यांच्या मूर्ती विराजमान होत्या. या वाहनामागे संतांचे रथ व त्यामागे संतांचे अनुयायी असलेले १० ट्रक्टर होते. या प्रसंगी पाच बँड, नाशिक येथील २ ढोल पथकासह शोभा यात्रा कुंभस्थळाहून धर्मस्थळाकडे १२.३० वा. च्या सुमारास रवाना झाली.
या शोभायात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे कुंभस्थळाजवळ आणि शोभायात्रा मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सकाळ पासूनच कुंभस्थळी समाज बांधवांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. महिलांनी पारंपारिक वेशभूषेत “लेंगी“ नृत्य केले. यात लहान मुली पासून ज्येष्ठ महिलेपर्यंतचा समावेश होता. या सोबतच महिलांनी पारंपारिक पोषाखात व पारंपारिक “लोक गीते“ गात तिज आणले. कुंभ स्थळी महिला गटा गटाने पारंपारिक लोकगीते गात पारंपारिक नृत्य करत होत्या.