जळगाव । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात वाढ पाहायला मिळाली. यामुळे ऐन दिवाळी तोंडावर दोन्ही धातूंनी विक्रमी पातळी गेल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला. दरम्यान यातच धनत्रयोदशीला सोने-चांदी स्वस्त झाले.
धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला जळगाव सुवर्णपेठेत सोने दरात ४५० रुपयाची घसरण झाली. यामुळे आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६० प्रति तोळा तर २४ कॅरेटचा भाव ७९,१५० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर जीएसटीसह ८१,५२५ रुपये इतका आहे. तर चांदीत एक हजार ६०० रुपयांची घसरण होऊन ती ९६ हजार ७०० रुपयांवर आली.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विविध वस्तूंसह सोने-चांदी खरेदीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सुवर्ण बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. त्यात यंदा धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने-चांदीच्या भावात घसरण झाली असून मुहूर्तावरही भाव कमी राहिल्यास खरेदीचा आनंद द्विगुणित होऊन खरेदी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीला जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६०,५०० रुपयांवर होता. तर चांदीचा दर विनाजीएसटी ७१,२०० रुपये प्रति किलो इतका होता. मात्र यंदा दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झाली. वर्षभरात सोने दरात जवळपास १८७०० रुपयापर्यंतची वाढ झाली तर दुसरीकडे चांदी दरात तब्बल २५,५०० रुपयाची वाढ झाली.