जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह निवडणूक विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात याच दरम्यान, पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून ५ कोटी ५९ लाख ६१ हजारांचे सोनं आणि चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते.
जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४ किलो सोनं आणि ३४ किलो चांदीचा समावेश आहे. जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकासह तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून हा साठा कोषागार कार्यालयात पाठविला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यानची ही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.एकूण तीन सुवर्ण व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते. पण त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने हा सर्व सोनं-चांदीचा साठा पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास केला जात आहे.