जळगाव । तुम्हीही सोने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला असून यावेळी त्यांनी सोने-चांदीवर लागणाऱ्या सीमा शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केली.
त्यानुसार आता सीमा शुल्क ५ टक्के इतके कमी करण्यात आले असून यामुळे आज मंगळवारी सराफा बाजारात सोन्यासह चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दिसली. जळगावच्या बाजारात सोन्यात २ हजार ५०० रुपयाची घसरण झाली आहे. काल जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे ७३ हजार ३०० इतके होते. आज सोन्याचे भाव ७० हजार ५०० इतके झाले आहेत. सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात वाढ केली होती. कस्टम ड्युटी १५ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली होती. दोन महिण्यापुर्वी म्हणजेच मे महिन्यात सोन्यासह चांदी किमतीने ऐतिहासिक पातळी गाठली होती. त्यावेळी जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७५ हजार रुपयांवर गेला होता. तर चांदी ९५ हजार रुपयावर गेली होती. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली होती.
मात्र यानंतर दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण दिसून आली. दरम्यान, मागील काही दिवसापासून सोन्याचा दर ७३ हजाराच्या घरात होता. मात्र आज बजेटनंतर सोन्याच्या दरात तब्बल २५०० रुपयाची घसरण झाली.