सोनं खरेदी करण्याआधी हे वाचाच…दोन महिन्यात दोन हजारांनी वाढलं सोनं

तरुण भारत लाईव्ह । १४ डिसेंबर २०२२ । लगनसराईची धूम सुरु होण्याआधीच सोने, चांदीचे दर देखील विक्रमी वेगाने वाढत आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यात जवळपास दोन हजार रुपयांनी सोनं महाग झालं आहे. सोन्याच्या किंमतीने ५४ हजाराचा टप्पा ओलांडला असून डिसेंबर अखेरपर्यंत ५६ हजारकडे सोनं पोहोचतं की काय अशी एक भीती देखील मनात आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीने ६८ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोनं खरेदीसाठी लोकांची सराफ बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र गत काही महिन्यांपासून स्थिर असणार्‍या सोन्यांच्या किंमती आता वेगाने उसळत आहेत. अवघ्या दोन महिन्यात दोन हजार रुपयांपेक्षा दरवाढ नोंदविण्यात आली आहे. गोल्ड रिटर्नने दिलेल्या आकडेवारीनुसार कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात ५५० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,८८० रुपये प्रति तोळा आहेत.

आज फ्युचर्स मार्केटमध्ये सकाळी सोन्याचा भाव १२२ रुपयांनी वाढून ५४,२५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत आज ४८३ रुपयाची वाढ झालेली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर ६८,२६९ रुपायांवर गेला आहे. आज सोन्याचा भाव ५४,१३२ रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर, एकदा किंमत ५४,१९७ रुपयांवर गेली. काही काळानंतर तो पुन्हा वाढून ५४,२५४ रुपयांपर्यंत गेला दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने लाल चिन्हावर व्यवहार करत आहे, तर चांदीमध्ये तेजी दिसून येत आहे.