जळगाव : अक्षय तृतीयेपासून सोने दरात घसरण दिसून आली होती. मात्र सोमवारी जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरात प्रति तोळा १६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भाव कमी-कमी होत गेलेल्या सोने भावात सोमवारी (५ मे) एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ९५ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तसेच चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ९५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सतत भाववाढ होत जाऊन २२ एप्रिलपर्यंत सोने ९९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर मात्र २३ एप्रिलपासून भाव कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ४ मेपर्यंत सोने ९४ हजारांवर आले. त्यानंतर सोमवारी (५मे) सकाळीदेखील हेच भाव कायम होते. मात्र दुपारी त्यात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली व सोने ९५ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
या दरवाढीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोने ९५,८०० (जीएसटीसह ९८६७४ रुपये) रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. अमेरिकन डॉलर वधारण्यासह वायदा बाजारातील शेवट्याच्या दिवशी सोन्याचा तुटवडा जाणवल्यामुळे ही दरवाढी झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
यूएस-चायना टेरिफ वारचे पडसाद
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारला आहे. वायदा बाजारात (एमसीएक्स) केल्या जाणाऱ्या वायद्याच्या परिपूर्तीसाठीची एक निश्चित तारीख असते. त्या दिवशी संबधित मालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार कटींग करण्याचा दिवस असतो. तो ५ मे रोजी होता. त्याच्या परिपूर्तीत सोन्याचा तुटवडा असल्याने सोन्याचे दर वाढले आहेत.