Gold Price : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर जगभरातील भांडवली बाजारांमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. अमेरिका आणि चीन यांच्याकडून एकमेकांवर जास्तीत जास्त कर लावण्याचा सपाटा सुरु आहे. परिणामी सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, मंगळवारी सकाळी प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला. त्यामुळे ग्राहकांना आता जीएसटीसह एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी एक लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सोन्याच्या किमतीत झालेल्या या तीव्र वाढीमागील कारणे अनेक आहेत, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे निर्माण झालेला व्यापार युद्धाचा तणाव.
सोने दरात दररोज नवीन विक्रम
मंगळवारी सकाळी बाजार उघडला तेव्हा सोन्याने पहिल्यांदाच ९८,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि काही मिनिटांतच त्याने ९९,००० रुपयांची उंचीही ओलांडली. ही वाढ केवळ देशांतर्गत बाजारपेठेपुरती मर्यादित नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याने जुने सर्व विक्रम मोडले आहेत. कॉमेक्स सोन्याचा भाव प्रति औंस $३,५०४.१२ वर पोहोचला आहे, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे.
सोन्याची मागणी का वाढत आहे?
ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि ट्रेड धोरणामुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. अमेरिकन डॉलर कमकुवत होत आहे आणि त्यासोबतच जागतिक मंदीची भीतीही वाढत आहे. अशा वातावरणात, गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे आणि फेडरल रिझर्व्हवरील दबावामुळे सोन्याच्या किमतींनाही आधार मिळत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे मत आहे.
५ वर्षांतील सोन्याची वाढ
गेल्या पाच वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेल्या बदलांवर नजर टाकली तर २०२० पासून त्याची किंमत जवळजवळ दुप्पट झाली आहे. २०२० मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ५०,१५१ रुपये होती आणि आता एप्रिल २०२५ मध्ये ती १ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, मार्च २०२३ मध्ये सोन्याने प्रति १० ग्रॅम ६०,००० रुपयांची पातळी ओलांडली आणि त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये ते ७०,००० रुपयांवर पोहोचले. या वर्षी २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याने ३२ टक्के परतावा दिला आहे.
आता सोन्यात गुंतवणूक करावी का ?
सोन्याच्या किमतीत सध्याची वाढ पाहता, अनेक गुंतवणूकदारांना आताच गुंतवणूक करावी की वाट पहावी असा प्रश्न पडत आहे. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोने हा अजूनही एक उत्तम पर्याय आहे. परंतु अल्पकालीन गुंतवणूकीसाठी थोडी वाट पाहणे शहाणपणाचे ठरू शकते कारण अशा वाढीनंतर काही प्रमाणात सोन्यात नफा बुकिंग होऊ शकते