सोनं घसरणीनंतर पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

तरुण भारत लाईव्ह  । २० फेब्रुवारी २०२३ ।  अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या किंमतीत चढउतार होत असल्याचे दिसून आले. आज सोमवारी पुन्हा वायदे बाजाराच्या सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झालेली दिसून आलीय. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घसरण नोंदविण्यात आलीय. सलग तिसऱ्या आठवड्यात किमती घसरल्यामुळे भारतातील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५६ हजाराच्या खाली पडला आहे.

MCX वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर किंचित १० रुपयांनी वाढून 56,259 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत १०० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 65,550 रुपयावर व्यवहार करत आहे.

सोन्याच्या महागड्या किंमतींमुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह काहीसा थंडावलेला दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,७०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५६, ५०० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ६७००० रुपये इतका आहे.

देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून या काळात सोन्याच्या दागिन्यांची चांगली मागणी असते. त्यामुळे येत्या काही महिन्यांत सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.