जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली होती. त्यानंतर पुन्हा दरात घसरण झाली होती. आता पुन्हा सुवर्णनगरीला दराची चकाकी मिळाली असून, गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर प्रतितोळा ३ हजार ७०० रुपयांनी वाढून जीएसटीसह एक लाख ६३१ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा दर प्रतिकिलो ९८ हजार रुपयांवर आहे.
सुवर्णनगरी म्हणून जळगाव शहराची राज्यासह देशभरात वेगळीच ओळख आहे. अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली होती. प्रतितोळा ९० हजारांवर असलेले सोने तब्बल लाखाचा टप्पा ओलांडून एक लाख चार हजारांपर्यंत पोहोचले होते. मध्यंतरी दोन ते तीन दिवस पुन्हा सोन्याचे दर घसरले होते.
काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर युद्धाचे ढग जमा झाले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, वाढत्या तणावामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घटना घडामोडींमुळे सोन्याच्या दरात पुन्हा वाढ दिसून आली आहे. दोन दिवसांपूर्वीच ६-७ मेच्या रात्री भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला आहे.
भारताकडून झालेली कारवाई पाहता या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने प्रतितोळा एक हजार ८०० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर मंगळवारी एक हजार ४०० रुपयांनी, तर बुधवारी पुन्हा त्यात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांत जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा ३ हजार ७०० रुपयांनी वाढले आहेत. सलग तीन दिवस झालेल्या या दरवाढीने सोन्याचा दर प्रतितोळा जीएसटीसह एक लाख ६३१ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा दर प्रतिकिलो ९८ हजार रुपयांवर आहे.
दर वाढण्यामागील कारणे
सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी औषधे आणि चित्रपटांवर करभार लावण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. ज्यामुळे जगभरातील व्यापाराबद्दल चिंता वाढली असून, रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष आणि भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव यांमुळे गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जाते. यात डॉलरची कमकुवतता हेदेखील कारण असल्यामुळे सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ होत आहे.