नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध सुरू झालं आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्ब वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांचं अतोनात हानी झाली आहे. त्याचा फटका दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. या युद्धाचा परिणाम भारतातील कॉमोडिटी मार्केट सोनं आणि चांदीवर झाला आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्ध होतं तेव्हा त्याचा फटका सोनं, चांदी आणि तेलावर होत असतो. यावेळीही इस्रायल आणि हमासच्या युद्धामुळे सोनं आणि चांदी महागणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
दरम्यान, युद्ध आणि जगभरातील आर्थिक संकटामुळे सोन्याची मागणी वाढत असते. युद्ध किंवा आर्थिक संकट आल्यावर गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित ऑप्शन असल्याचं मानलं जातं. जागतिक पातळीवर वेगाने घटना घडत आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओच्या सुरक्षेसाठी सोने हा चांगला पर्याय आहे. सोन्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात घडामोडी घडल्यास डॉलरही मजबूत होत असतो.
भारतात सण उत्सवाचे दिवस असतांनाच इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही देशांच्या युद्धानंतर सोने-चांदीची मागणी वेगाने वाढली आहे. फेस्टिव्ह सीजनमध्ये भारतात सोने आणि चांदीची मागणी वाढू शकते. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती वाढू शकतात. म्हणजेच सण उत्सवाच्या काळात सोने-चांदी खरेदी करणं महागात पडू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.