जळगाव : शेअर बाजारात मोठ्या पडझडीचे वातावरण असतानाच मौल्यवान धातूंनी मुसंडी मारत ग्राहकांच्या खिशावर जोरदार ताण आणला आहे. जळगाव सुवर्णपेठेत सोमवारी सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे मंगळवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,२३६ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर (विनाजीएसटी) ७८,८०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर ८१,२०० रुपये झाला आहे. चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून येते, जे ९३,००० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.
ग्राहकांच्या अपेक्षांना तडा
गेल्या वर्षाच्या शेवटी सोन्याचा दर ८२,००० रुपयांवर पोहोचल्याने नवीन वर्षात दर कमी होण्याची अपेक्षा होती. परंतु, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दर वाढत असल्याने ग्राहकांमध्ये निराशा पसरली आहे. जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति तोळा ११०० ते १२०० रुपयांची वाढ झाली आहे.
लग्नसराईत ग्राहकांची चिंता
लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या खरेदीला महत्त्व असते. मात्र, सोन्याच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या बजेटला झळ बसत आहे. वाढलेल्या किमतींमुळे अनेक ग्राहक लग्नसराईच्या खरेदीसाठी अतिरिक्त खर्चाचा सामना करत आहेत.
हेही वाचा : ‘किती पैसे खाणार ? घे खा !’, नागरिकांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला शिकवला पैसे उधळून धडा, व्हिडिओ व्हायरल
तज्ज्ञांचा अंदाज
तज्ज्ञांच्या मते, 2025 मध्ये सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतात. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ८५,००० ते ९०,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक आणि स्थानिक आर्थिक घडामोडी या वाढीमागील महत्त्वाचा घटक ठरणार आहेत. सोन्याचे दर अशाच प्रकारे वाढत राहिल्यास ग्राहकांना त्यांच्या खरेदीत काटकसर करावी लागेल, अशी शक्यता आहे.