---Advertisement---
Gold Rate : गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झालेल्या सोन्याच्या दरात आज, सोमवारी थोडीशी घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवानिमित्त सोने खरेदी करणाऱ्यांना काहीचा दिलासा मिळाला आहे.
जळगाव सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोने प्रति तोळा १ लाख १० हजार २०० रुपये, २२ कॅरेट सोने प्रति तोळा १,००,९४५ रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदी प्रति किलो १,२९,५०० रुपयांवर पोहोचली आहे.
एमसीएक्सवर आज सकाळी ऑक्टोबर सोन्याचे वायदे ०.०६ टक्क्यांनी कमी होऊन ते एक लाख ९ हजार ३०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले होते. गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी ही किंमत १,०९,८४० रुपयांवर पोहोचली होती, जी एक विक्रमी उच्चांक होती. दुसरीकडे, चांदीच्या डिसेंबरच्या वायदेत प्रति किलो १,२८,९८३ रुपयांची किरकोळ वाढ नोंदली गेली.
सप्टेंबर महिन्यात दिवाळी, नवरात्र आणि करवा चौथ यासारख्या सणांच्या हंगामाला सुरुवात होते. सोन्याला शुभ मानले जाते आणि लोक ते भेटवस्तू किंवा गुंतवणूक म्हणून खरेदी करतात म्हणून या सणांमध्ये सोन्याची मागणी वाढते. म्हणूनच, सणांच्या हंगामात आणि त्यानंतर लग्नाच्या हंगामात भारतात सोन्याची मागणी वाढते.
सोन्याच्या किमतीत आणखी चढ-उतार?
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीमुळे आणि कमकुवत कामगार बाजारातील आकडेवारीमुळे व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमती अस्थिर राहतील. सणांच्या हंगामामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे, म्हणून जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोने समाविष्ट करण्याची ही योग्य वेळ असू शकते.