जळगावामध्ये चांदीत 2000 तर सोन्यात 700 रुपयांची वाढ; आताचे भाव वाचूनच भरेल धडकी..

जळगाव । दिवाळी सारखा सण आता अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना दुसरीकडे सोने-चांदीची दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीय. जळगावच्या सुवर्णनगरीत सोमवारी (२१ ऑक्टोबर) चांदीच्या दरात एका दिवसात दोन हजारांची वाढ झाल्याने चांदीने एक लाखाचा टप्पा पार केला. तर सोनेही ७०० रुपयांनी महागले. यामुळे दिवाळीत सोने चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

सध्या सोन्यासह चांदीच्या किमतीने आजपर्यंतची सर्वात उच्चांकी मजल मारली आहे. चीनमध्ये बँकांच्या व्याजदरवाढीसह जागतिक घडामोडींमुळे मागील आठवडाभरापासून सोने-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे.

काल सोमवारी जळगाव सराफ बाजारात काल सोने दरात ७०० रुपयाची वाढ झाली यामुळे २४ कॅरेट सोने ७८,९०० रुपये प्रति तोला तर जीएसटीसह ८१,२६८ रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदी २००० रुपयांनी वाढून ९९००० रुपये किलोवर तर जीएसटीसह १,०९,९७० वर पोहोचली.

गेल्या सहा दिवसांत चांदी ६ हजार रुपयांनी महागली आहे. याच काळात सोन्याच्या दरातही १७०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात खूप मोठी वाढ आणि घसरण होत नाही, असा नेहमीच समज आहे. तो या वर्षी ऑक्टोबरमध्ये दूर झाला. १६ ऑक्टोबरला ९३ हजारांवर पोहोचून तेजी सुरू झाली. ती सहा दिवसांत सहा हजारांनी वाढली. या काळात सोने प्रतितोळ्यामागे १७०० रुपयांनी महागले.

दरवाढीने कारण काय ?
एकीकडे इराण-इस्रायलमधील युद्ध आणि दुसरीकडे बॅंकांकडून सोने खरेदी केली जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत. ही दरवाढ दिवाळीमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाला.सध्या वाढत्या किमतींनी दिवाळीत सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.