बोंबला! दिवाळी तोंडावर सोने-चांदीचा भाव आणखी वाढला, जळगावमधील आजचे भाव तपासा..

जळगाव । दिवाळी तोंडावर सोने आणि चांदीच्या किमतीने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण होण्याची अपेक्षा ग्राहकांना असताना सोने आणि चांदी दरात पुन्हा एकदा वाढ झालीय.

दोन दिवसात ६०० रुपयांची घसरण झालेल्या सोन्याच्या किमतीत (२६ ऑक्टोबर) ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता जळगाव सराफ बाजारात सोने ७९ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. दुसरीकडे चांदीच्या भावातही १ हजार रुपयांची वाढ होऊन ती ९९ हजार ००० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

२३ ऑक्टोबर रोजी ७९ हजार ५०० रुपयांवर पोहोचलेल्या सोने भावात २४ रोजी ५०० रुपयांची तर २५ रोजी १०० रुपये अशी दोन दिवसात ६०० रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे सोने ७८ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. २६ ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा ७०० रुपयांची वाढ होऊन ते ७९ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तर २३ ऑक्टोबर रोजी एक लाख रुपये प्रति किलोवर पोहचलेल्या चांदीच्या भावात सलग दोन दिवस प्रत्येकी एक हजार रुपयांची घसरण होऊन ती २५ ऑक्टोबर रोजी ९८ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर २६ रोजी चांदी भावात ३०० रुपयांची वाढ झाली.

सणासुदीच्या ऐन मुहूर्तावर सोन्याने उच्चांक गाठला आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना सोन्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत. दरम्यान दिवाळीनंतर लग्न सराईला सुरुवात होणार असून याकाळात सोने चांदीला मोठी मागणी असता. त्यामुळे दोन्ही धातूंचे दर पुन्हा महागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.