तरुण भारत लाईव्ह | १६ डिसेंबर २०२२ | सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असणार्या सोन्याच्या दराने गेल्या दोन महिन्यात मोठी उसळी घेतली आहे. सध्या लगनसराईची धामधूम सुरु असतांना सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याचा दर तब्बल २८ महिन्यांनंतर ५४ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या वर पोहोचला आहे. नव्या वर्षात सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसणार असून ते ६४ हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
एका अहवालानुसार, संपूर्ण जग आर्थिक अनिश्चितेच्या लाटेवर हिंदोळे घेत असल्यामुळे अनेक देश सोन्याचा साठा वाढवित आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले आहे. गेल्या तिमाहीत भारतानेही सुमारे १६ टन सोनेखरेदी केले. दुसरीकडे शेअर बाजारात उच्चांक गाठल्यानंतर या आठवड्यात पडझड झाली आहे. मात्र, त्याचवेळी सोन्याला मोठी झळाळी आली आहे.
शेअर बाजारात पडझड होत असते त्यावेळी लोकांचा सोने खरेदीकडे कल असतो. याशिवाय लग्नाचा हंगाम असल्यामुळे सध्या सोन्याची मागणीही वाढली आहे. ५५,५१५ रुपये सोने प्रति १० ग्रॅम १० ऑगस्ट २०२० रोजी झाले होते. मात्र, दुसर्याच दिवशी ते घसरून ५३,९५१ रुपयांवर आले होते. त्यानंतर सोने ५४ हजार रुपयांच्या खालीच राहिले. २०२३ मध्ये सोपे ६४ हजार रुपयांच्या वर पोहोचेल, असा अंदाज केडिया डव्हाजरीचे संचालक अजय केडिया यांनी वर्तविला आहे.