न्यू इअरमध्ये स्वस्त होणार सोनं?

मुंबई : जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती वाढत आहे. येणार्‍या काळात सोनं विक्रमी पातळीवर पोहचेल, अशी अटकळ देखील बांधली जात आहे. अशात कॉमर्स मिनिस्ट्रीने २०२३ च्या बजेटमध्ये सोन्यावरील आयात शुल्क म्हणजेच निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यामुळे नव वर्षात सोनं स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, यामुळे देशातील निर्यातीला चालना मिळेल तसेच रत्ने आणि दागिन्यांच्या उत्पादनात वाढ होईल. केंद्र सरकारने जुलै महिन्यात सोन्यावरील आयात शुल्क १०.७५ टक्क्यांवरून १५ टक्के केले होते. चालू खात्यावरील तूट कमी व्हावी आणि सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा बसावा, या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले होते.

याशिवाय निर्यात वाढवण्यासाठी इतर उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे. रत्ने आणि दागिन्यांची निर्यात करणार्‍यांनी बर्‍याच काळापासून आयात शुल्क कमी करण्याची मागणी करीत आहेत. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिलचे (जीजेईपीसी) माजी अध्यक्ष कॉलिन शाह म्हणाले की, १ फेब्रुवारी रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पात निर्यात प्रोत्साहन उपायांची घोषणा करण्याची उद्योगांना आशा आहे.

सोन्यावरील आयात शुल्क कमी करणे आणि दागिन्यांसाठी प्रगतीशील दुरुस्ती धोरणामुळे या क्षेत्राला मोठा फायदा होईल. कच्च्या हिर्‍यांवरील कर आणि प्रयोगशाळेत हिरे तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या हिर्‍यावरील शुल्क काढून टाकले जाईल.