तरुण भारत लाईव्ह । २३ मे २०२३। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताचं नाव जगात गाजवलं आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुरुषांच्या भाला फेकीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने २२ मे रोजी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत भालाफेकच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.
या क्रमवारीत नीरज १४५५ गुणांसह अव्वल आहे. ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स १४३३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकुब वादलेच १४१६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. २५ वर्षीय नीरज गेल्या वर्षी ३० ऑगस्टला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. त्या वेळी पीटर्स अव्वल क्रमांकावर होता. यंदाच्या मोसमात नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर कामगिरी नोंदवून सुवर्णपदक मिळवले होते.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट ठरला. एवढेच नाही तर भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा वैयक्तिक खेळाडू ठरला. २५ वर्षीय नीरजने तिथूनच सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरला. स्टॉकहोम येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजच्या नावावर ८९.९४ मीटर फेकण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे.