Gondia : नारी शक्ती वंदन विधेयकामुळे संसदेसह राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग : उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Gondia :  संसदेने नारी शक्ती वंदन विधेयक पारीत केले असून यामुळे येत्या काळात संसदेसह  राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येणार आहे.  या पार्श्वभूमीवर नारीशक्तीच्या सहाय्याने देशाच्या अमृत काळात  ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने विकसित भारताची वाटचाल अधिक मजबुतीने होईल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी  व्यक्त केला.

 

गोंदिया येथे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंतीदिन कार्यक्रमात उपराष्ट्रपती  जगदीप धनखड यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आणि पत्रकारांना गौरविण्यात आले तर गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषधे प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, सुनील मेंढे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. सी. रमेश, राहूल कृष्णा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

केंद्र शासनाकडून शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये देण्यात येतात. महाराष्ट्र राज्याने त्यात प्रति शेतकरी अधिकचे ६ हजार रुपये टाकून ‘नमो शेतकरी महा सन्मान योजना’ सुरु करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. १ रुपयात पीक विमा देवून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशासाठी दिशादर्शक कार्य केले असल्याचे गौरवोद्गारही  उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी काढले.

 

राज्य शासनाच्या वतीने ३० कोटींचा निधी :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

शिक्षण, सिंचन, उद्योग आदींच्या माध्यमातून गोंदियाचे सुपूत्र मनोहरभाई पटेल यांनी पश्चिम विदर्भाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी राजकीय क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. नगर परिषदेपासून ते संसद आणि विधीमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय  कार्य केले आहे. गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी भरीव कार्य केले आहे. या नगर परिषदेचे सुंदर, सुबक भवन निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ३० कोटींचा निधी येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.