तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळाव्याअंतर्गत नव्याने भरती झालेल्या ५१.००० लोकांना आज नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. हा रोजगार मेळा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
गृह मंत्रालयाच्या या रोजगार मेळाव्यात केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर यासारखे विविध सशस्त्र पोलीस दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) तसेच दिल्ली पोलीस भरती या अंतर्गत नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. पंतप्रधान आज सकाळी १०:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्याने भरती झालेल्या ५१,००० हून अधिक नियुक्ती पत्रे देतील.
या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान तरुणांनाही संबोधित करणार असल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले आहे. विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. तसेच पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार 51 हजार लोकांना विविध विभागांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.
या भरतीमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की रोजगार मेळा हा युवकांच्या सक्षमीकरणासाठी एक पाऊल आहे, ज्या अंतर्गत देशाच्या विकासात तरुणांना संधी उपलब्ध करून दिली जाईल.