मुंबई : यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान, एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. हातातोंडाशी आलेले पीक हिरावून गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाला. यावर्षी तरी चांगला पाऊस पडावा अशी आशा ते व्यक्त करत आहे. त्यामुळे यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक दृष्टीकोनातील चिंता कमी झाली आहे.
देशामध्ये यावर्षी सामान्य मान्सून राहण्याचा अंदाज आहे. यावर्षी 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी हवामान खात्याने 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण यावर्षी 96 टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज दिला आहे.
महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस
महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात यावर्षी कमी पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. राज्यातील शेतकरी हे हवामान विभागाचा अंदाज पाहूनच शेतीच्या कामाच्या तयारीला लागतात. त्यामुळे त्यांचे हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष असते. अखेर हा अंदाज आज जाहीर करण्यात आला. महत्वाचे म्हणजे हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावासचा फटका बसला असून शेतपिकाचे मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. द्राक्ष, कांदा, गहू, ज्वारी, भाजीपाला, वांगी, टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या नुकसानग्रस्त भागांची मंत्र्यांकडून पाहणी केली जात आहे. तसंच या भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.