रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारची नवी सुविधा, 2024 पर्यंत मिळणार लाभ

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील २६९ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) फोर्टिफाइड तांदूळ (पोषक घटकांनी समृद्ध) वितरित केला जात आहे.

देशातील उर्वरित जिल्हे मार्च २०२४ च्या अंतिम मुदतीपूर्वी कव्हर केले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली आहे.

गेल्या दोन टप्प्यात फोर्टिफाइड तांदूळ वितरण यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे, असे संजीव चोप्रा यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, “केंद्र सरकारचा हा एक अनोखा आणि अतिशय यशस्वी उपक्रम असून, गेल्या दोन वर्षांत त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही खूप उत्साहित आहोत.” तसेच, यापूर्वी काही गैरसमज झाले होते, मात्र ते दूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या उपक्रमामुळे स्वस्थ भारताचा पाया रचला जाईल, असे संजीव चोप्रा म्हणाले.

याचबरोबर, आम्ही आतापर्यंत २६९ जिल्ह्यांमध्ये पीडीएसद्वारे (रेशन दुकान) मजबूत तांदूळ वितरण सुरू केले आहे. ज्या गतीने आपण प्रगती करत आहोत, ते पाहता उर्वरित जिल्हे मुदतीपूर्वी योजनेच्या कक्षेत आणले जातील, असे संजीव चोप्रा यांनी सांगितले. तसेच, देशात सुमारे ७३५ जिल्हे आहेत, त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक लोक भात खातात. देशात पुरेसा मुबलक तांदूळ आहे, कारण सध्या या तांदळाची उत्पादन क्षमता सुमारे १७ लाख टन आहे, असेही संजीव चोप्रा म्हणाले.