---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे १५ तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य शासनाने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर आता १५ तालुक्यांसाठी ३०० कोटी रूपयांच्या मदतीचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे मदत वाटपाला लवकरच सुरूवात होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोडच होणार आहे.
सप्टेंबर महिना हा शेतकऱ्यांसाठी काळच ठरला. जिल्ह्यात यंदा १०० टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमानासह अतिवृष्टीचा फटका सर्वच तालुक्यांना बसला. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले. कापूस, केळी, मका ही पीके अक्षरशः उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला. हीच परीस्थिती राज्यभरात निर्माण झाल्याने पंचनाम्याअंती राज्य शासनाने आर्थिक मदतीचे ३२ हजार कोटींचे पॅकेज काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.
विभागनिहाय मदतीचा निघाला जीआर
राज्य शासनाने मदतीची घोषणा केल्यानंतर शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी विभागनिहाय मदतीचा जीआर अर्थात शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ३ लाख २५ हजार ३५९ शेतकऱ्यांसाठी ३०० कोटीची मदत दिली जाणार आहे. या मदत वाटपाला सुरूवात होऊ शेतकऱ्यांना दिवाळीत मोठा दिलासा मिळणार आहे.