सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार; ‘या’ ३ मंत्र्यांवर जबाबदारी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात परिस्थितीत दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी केली. त्यानंतर आज सरकारकडून ३ मंत्र्यांचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेऊन आरक्षणाबाबत प्रक्रिया आणि सरकार करत असलेले प्रयत्न याबाबत चर्चा करणार आहेत.

सरकारकडून मंत्री उदय सामंत, अतुल सावे आणि धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिष्टमंडळात सरकारमधील तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंत, अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि भाजपाकडून अतुल सावे यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार आहेत.

जरांगे पाटील यांची भेट घेण्यापूर्वी या तिन्ही मंत्र्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी चर्चा केली. धनंजय मुंडे, अतुल सावे हे मराठवाड्यातील आहे. तर उदय सामंत कोकणातले आहेत. या तीन मंत्र्यांसोबतच संदिपान भुमरे आणि आमदार नारायण कुचे यांचाही शिष्टमंडळात समावेश आहे. काल सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावी अशी विनंती सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे.