Government Medical College and Hospital : पंतप्रधान करणार रविवारी नंदुरबारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे भूमीपूजन

Government Medical College and Hospital :   नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालयाचे भूमीपूजन उद्या  २५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार ऑनलाईन पद्धतीने असल्याची माहिती वैद्यकीय  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमने यांनी  दिली.

 

टोकरतलाव रोडलगत वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेत दुपारी ४ ते ४:४५ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीया, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा केंद्रीय जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, आमदार अमरीश पटेल, किशोर दराडे, आमश्या पाडवी, सत्यजित तांबे, ॲड. के.सी. पाडवी, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व आयुष चे आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी मनीषा खत्री वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

 

आदिवासी भागातील पहिलेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय

 

आदिवासी भागातील देश व राज्य पातळीवरील हे पहिलेच वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रूग्णालय आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाची संकल्पना त्यांनी मांडली. पुढे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून ते सुरू व्हावे, यासाठी खासदार डॉ. हिना गावित यांनी वेळोवेळी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.

 

रामायणकालीन इतिहासाच्या खाणाखुणा आपल्या अंगाखांद्यावर घेवून विकासाकडे वाटचाल करणाऱ्या रौप्य महोत्सवी नंदुरबार जिल्ह्यासाठी आज या वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमीपूजनातून, खऱ्या अर्थाने ‘आरोग्य संजीवनी’च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लाभणार असल्याची भावना मंत्री डॉ. विजकुमार गावित यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या निमित्ताने अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांनी केले आहे.