नवी दिल्ली : स्मार्ट आणि डिजिटल युगात मोबाईल कॉलिंगच्या मदतीने फसवणूक होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. खोट्या नावाने फोन करुन सायबर भामटे सर्वसामान्यांना आर्थिक गंडा घालतात. बर्याचवेळा फसवणूक झालेल्या ग्राहकाला कळतच नाही की कुणी फोन केला होता. ही फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार मोबाईल कॉलिंगच्या दिशेने एक नियम आणणार असून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच केवायसी आधारित प्रक्रिया सुरू करणार आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या मोबाईल स्क्रीनवर फोटोसह कॉल करणार्या व्यक्तीचे नाव दिसेल. जे मोबाईलवरून कॉल करून बँक फसवणुकीच्या घटना रोखण्यास मदत करेल.
सध्या अननोन मोबाईल ओळखण्यासाठी ट्रू कॉलर सारखे थर्डपार्टी अॅप वापरले जातात मात्र त्यातूनही सहज फसवता येणे शक्य आहे. यामुळे केंद्र सरकार आणि ट्राय मिळून एक नवीन प्रणाली आणणार आहेत, ज्यामध्ये कॉल करणार्याच्या मोबाईल नंबरसोबत कॉलरचा फोटोही दिसेल. यासाठी सरकार मोबाईल नंबर केवायसी प्रणाली लागू करणार आहे. यासाठी सरकार दोन प्रकारची यंत्रणा राबवू शकते, पहिली आधार कार्ड आधारित आणि दुसरी सिम कार्ड आधारित.
ट्रायच्या नवीन प्रणालीमध्ये सर्व मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडले जातील. ज्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला कॉल करेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे कॉलरचा मोबाइल नंबर आणि व्यक्तीचे नाव देखील असेल. आधार कार्डमध्ये जे नाव लिहिलेले असेल तेच नाव असेल. सरकार सिमकार्ड खरेदी करताना दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे कॉल करणार्या लोकांचा फोटो संलग्न करेल. अशा प्रकारे, बनावट लोक ओळखले जाऊ शकतात. म्हणजे सिम खरेदी करताना जो फोटो टाकला होता, तोच फोटो कॉलिंगच्या वेळी मोबाईल स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक करणार्यांना सहज ओळखता येईल.