मुंबई: मुंबई-ठाण्यात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीसाठी शिवसेना, भाजप, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशा सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरासह राज्यातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांच्या लाखो मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
रांचीमध्ये जन्मोत्सवाच्या उत्सवानंतर मध्यरात्री दहीहंडी फोडण्यात आली. तर मथुरेत देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष करण्यात आला. याशिवाय ठिकठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
राज्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रात्री बारा वाजता मुंबईतील अनेक भागात मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तरुणांनी (Youth) अनेक थर रचत दहीहंडी फोडली आणि आनंद लुटला. मुंबईतील दादर, नायगाव, वरळी, लोअर परळ आणि इतर परिसरात मोठ्या उत्साहाने दहीहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. त्यानंतर आज देखील मुंबई ठाण्यासह इतर भागांत ठिकठिकाणी दहीहंडीच्या थरांचा थरार पाहायला मिळत आहे.
यंदा मुंबईत जवळपास १७ हजार ते १८ हजार दहीहंड्या उभारल्या जाणार असल्याचे चित्र आहे. या दहीहंड्या फोडण्यासाठी केवळ मुंबईत सुमारे ९०० गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. यंदा गोविंदा पथकांना बक्षिसांचीही मोठी कमाई होणार आहे. अनेक मंडळांनी सहा थरांसाठी ७ हजार रुपये, सात थरांना १५ हजार रुपये, तर आठ थरांसाठी २५ ते ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. नऊ आणि दहा थर लावणाऱ्या मंडळांना काही लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती दहीहंडी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.