पाचोरा : तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामपंचायत सदस्याने गावठाण जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याने त्यांना जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार अपात्र ठरविले आहे. दरम्यान, या घटनेने ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील खडकदेवळा येथील समाजसेवक गोकुळ देवरे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम १४ (ज-३) व १६ नुसार जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. तक्रारीत नमूद केले होते की, खडकदेवळा ग्रामपंचायत सदस्य अनिल विश्राम पाटील यांचा कालावधी २०२१ ते २०२६ आहे. मौजे खडकदेवळा बु. येथील गट नं 21/1/अ ही सुनील युवराज पाटील यांचे मालकीची मिळकत मालकी हक्काने नसतांना त्यांनी संपादीत जमिनीच्या क्षेत्रापलीकडील सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या जमिनीवर मालकी हक्क दाखवून जेणेकरुन ती मिळकत सुनिल युवराज पाटील यांचीच आहे असे दर्शवून या मिळकतीवर आरसीसी बांधकाम केलेले आहे. प्लॉट नं 27 च्या हद्दीत बांधकाम न करता सर्व्हे नं 168 पैकी या गावठाण गल्लीत उर्वरीत जागेत बांधकाम केल्याने ग्रामपंचायत सदस्य अनिल विश्राम पाटील यांना अपात्र करावे अशी विनंती अर्जदार गोकुळ देवरे यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होती.
यावर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, तहसीलदार व गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचा या बाबतीत अहवाल मागवून घेतला. त्यानंतर खडकदेवळा ग्रामपंचायत सदस्य अनिल विश्राम पाटील यांना पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे, असा निर्णय दिला. अर्जदार गोकुळ देवरे याच्या कडुन ऍड. शांतीलाल सैदाने यानी काम पाहिले.