‘संकटमोचक’ कॉफीटेबल बूकचे थाटात प्रकाशन

‘जळगाव तरुण भारत’च्या ‘संकटमोचक’ या कॉफीटेबल बूकचे प्रकाशन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जळगाव तरुण भारतचे निवासी संपादक चंद्रशखेर जोशी, सर्जना मीडियाचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, विशेषांक संपादक, संचालक विभाकर कुरंभट्टी, संचालक संजय नारखेडे, जिल्हा केमिस्ट असो.चे अध्यक्ष सुनील भंगाळे, भाजप नेते डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, तरुण भारतचे व्यवस्थापक मनोज महाजन, विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे.

 

तरुण भारत लाईव्ह । पुणे : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे संकटांना धैर्याने सामोरे जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा समाजाभिमुख कसा असावा याची उदाहरणे द्यायची झाल्यास गिरीश महाजन यांच्या रूपाने देता येतील. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘जळगाव तरुण भारत’ने प्रसिद्ध केलेले ‘कॉफीटेबल बूक’ हा त्यांच्या कार्याचा आरसा असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे काढले.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीेची बैठक गुरुवारी पुणे महापालिकेच्या बालगंधर्व नाट्यगृहात पार पडली. प्रदेश कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांसह केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची या बैठकीस विशेष उपस्थिती होती. बैठकीचे प्रथम सत्र आटोपल्यानंतर नाट्यगृहाच्या भव्य व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘जळगाव तरुण भारत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘संकटमोचक’ या कॉफीटेबल बूक’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश शर्मा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सर्जना मीडियाचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कॉफीटेबल बूकचे अतिथी संपादक म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी काम पाहिले.

बालगंधर्व नाट्यगृहात यावेळी राज्यातील मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, खासदार, आमदार शेकडो पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. ‘जळगाव तरुण भारत’च्या या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी स्वागत आणि कौतुक केले. नामदार गिरीश महाजन यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा पूर्ण आढावा घेणारे लेख आणि मनमोहक छायाचित्रे या ‘कॉफीटेबल बूक’मध्ये आहेत.