यावल : शहरातील बडगुजर गल्लीतील रहिवाशी एका 36 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांच्या किराणा दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी रात्री निदर्शनास आला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपक ईश्वर बडगुजर (36) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आरटीओ एजंटचे काम करणारा दीपक हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. या तरुणाच्या वडिलांची घरालगतच एक छोटीशी किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री हा तरुण आपल्या वडिलांच्या दुकानात गेल्यानंतर त्याने एका कापडाच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने नातेवाईकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉ. सचिन देशमुख यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी गणेश बडगुजर यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत दीपक बडगुजर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी असा परीवार आहे. तरुणाने आत्महत्या का केली ? हे कळू शकले नाही. तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.