GST आघाडीवर सरकारसाठी आनंदाची बातमी ; डिसेंबर महिन्यात संकलनात मोठी वाढ

नवी दिल्ली । जीएसटी आघाडीवर सरकारसाठी आनंदाची बातमी आली आहे. डिसेंबर 2023 मध्ये GST संकलनात 10 टक्के वाढ झाली होती. अर्थ मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. त्यानुसार डिसेंबर 2023 मध्ये सरकारकडे एकूण 1.64 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन होते.

वस्तू आणि सेवा कर (GST) मध्ये वार्षिक आधारावर 10 टक्के वाढ झाली आहे. तथापि, नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत डिसेंबरमध्ये जीएसटी संकलनात 2 टक्के घट झाली आहे. हा सलग 10वा महिना आहे जेव्हा मासिक जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे.

एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत जीएसटी संकलनात 12 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 14.97 लाख कोटी रुपये GST संकलन झाले. तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये होते.

डिसेंबर 2023 मध्ये, CGST संकलन 30443 कोटी रुपये आणि SGST संकलन 37935 कोटी रुपये होते. डिसेंबर 2023 मध्ये IGST संकलन 84255 कोटी रुपये होते, तर उपकर 12249 कोटी रुपये होता. सरकारने सांगितले की जीएसटी पोर्टलची कर भरण्याची क्षमता दुप्पट झाली आहे. आता जीएसटी पोर्टलद्वारे एका तासात तीन लाखांपर्यंत रिटर्न भरले जात आहेत.