GST कौन्सिलच्या बैठकीत आता ‘या’ वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय ; 1 ऑक्टोबरपासून नियम लागू

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी 51 वी जीएसटी कौन्सिलची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली असून यात काही मोठे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो, घोडेस्वारी यांसारख्या खेळांवर जीएसटी लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर सांगितले की 1 ऑक्टोबरपासून ते ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोवर 28% जीएसटी लागू केला जाणार असल्याचं सांगतिले.  नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन गेमिंग कंपन्या, कॅसिनो यांना २८ टक्के जीएसटी भरावा लागणार. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर 6 महिन्यांनंतर त्याचा आढावा घेतला जाईल.

“६ महिन्यांनंतर ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोवरील २८ टक्के जीएसटीच्या कर दरामध्ये काही बदल जाणवला तर तो अधिसूचनेद्वारे केला जाईल. त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता नसणार.”

दरम्यान,  दिल्ली, सिक्कीम आणि गोव्याच्या मंत्र्यांनी ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटीचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. मात्र गेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांची इच्छा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.