धुळे : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातील मोहाडी हद्दीतील अवधान एमआयडीसीतील एम. ६३ या जागेवरील शौर्य डेअरीतून केमिकल व मिल्क पावडरच्या माध्यमातून तयार केलेले सुमारे ३०० किलोहून अधिक पनीर जप्त केले. गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सहा संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत संशयित हे फर्टिलायझरसाठी उपयोगी येणाऱ्या केमिकलद्वारे पनीरची निर्मिती करीत असल्याचा संशय आहे. शिवाय मिल्क पावडरचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर पनीरची निर्मिती करून त्याची विक्री झाल्याचा संशय आहे. अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, जिल्हा दूध भेसळ समितीचे अमित पाटील आदींनी धाव घेत पाहणी केली.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, सतीश जाधव, श्याम निकम, हवालदार दिनेश परदेशी, सुरेश भालेराव, कैलास महाजन, अमोल जाधव, किशोर पाटील, संदीप पाटील, नितीन धिवसे, योगेश जगताप, मायूस सोनवणे आदींच्या पथकाने केली.